
जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘युवारंग युवक महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवशी भारतीय संस्कृती, संगीत आणि नृत्याचे अप्रतिम दर्शन घडले. भारतीय लोककला, नाट्य, शास्त्रीय नृत्य, सुगमसंगीत आणि पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांनी युवारंगाचा परिसर रंगला होता. विशेष म्हणजे, बेल्जियम येथील विद्यार्थी फेलिक्स ग्युबेन यांनी भारतीय संस्कृतीचा उत्सव अनुभवत भारतीय कलाकारांसोबत नृत्यात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जी.एच. रायसोनी कॉलेजच्या प्रांगणात सुरू असलेल्या या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात भारतीय लोकसमुहनृत्य स्पर्धा पार पडली. “केसरीया बालमा”, “रून झुन बाजे पुखराज”, “विठूचा गजर”, “आईच्या नावाचा गोंधळ” अशा सादरीकरणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सहभागी संघांनी राजस्थानी, गुजराथी, कोळी, आदिवासी आणि खान्देशी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोकसंस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवले. एकूण २२ महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेत भरतनाट्यम, आनंद तांडवम आणि कथ्थक या प्रकारांनी उपस्थितांची दाद मिळवली. आठ महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तर कवी प्रेम धवन सभागृहात झालेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी ‘विकसनशील भारत २०३०’ हा विषय देण्यात आला होता. पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी कल्पक आणि अर्थपूर्ण रेखाटन सादर केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात भारतीय नाट्यसंगीत (एकल) आणि सुगमसंगीत या प्रकारांत विद्यार्थ्यांनी गायन कौशल्याचे प्रदर्शन केले. ९ विद्यार्थी गायकांनी नाट्यसंगीत सादर केले, तर सुगमसंगीत स्पर्धेत ३७ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. प्रत्येक कलावंताने आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना भारावून टाकले.
या दिवशी युवारंगाची एक विशेष झलक बेल्जियमच्या फेलिक्स ग्युबेन यांच्या सहभागाने उजळली. रोटरी युथ एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत भारतात शिक्षणासाठी आलेल्या फेलिक्स यांनी भारतीय लोकनृत्याचे सादरीकरण पाहून आनंद व्यक्त केला. आदिवासी नृत्यावेळी त्यांनी स्वतः ढोल वाजवत ताल धरत सहभागी होत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. भारतीय कलावंतांच्या उर्जेने आणि संस्कृतीप्रेमाने ते भारावल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना फेलिक्स म्हणाले, “भारताची कला, संगीत आणि लोकसंस्कृती अतिशय रंगीबेरंगी आणि उत्साही आहे. युवारंग हा महोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे.”
युवारंग महोत्सवाच्या संध्याकाळी एकांकिका स्पर्धेत ९ संघांनी सहभाग घेतला. “मादी”, “कॅनल”, “शेवटंच पत्र”, “परवानगी पत्र” आणि “म्हसनातील सोनं” या एकांकिकांतील अभिनयाने विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
महोत्सवाच्या विविध रंगमंचांवर स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष अॅड. नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य प्रा. संदीप नेरकर, प्रा. मंदा गावीत, स्वप्नाली काळे, दीपक पाटील, प्राचार्य एस.एन. भारंबे, डॉ. प्रिती अग्रवाल, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. राम भावसार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या चार दिवसीय युवारंग महोत्सवाचा समारोप १२ ऑक्टोबर रोजी सकाळी पारितोषिक वितरण सोहळ्याने होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, सिनेकलावंत केतकी माटेगावकर आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात येतील.



