
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागात महिला व बालसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण “ALERTO SOS” मोबाईल ॲप विकसित केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांमध्ये मोठे स्वागत होत आहे.
या ॲपचा मुख्य उद्देश संकटाच्या वेळी महिलांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे हा आहे. ॲपमधील SOS बटण दाबल्यावर वापरकर्त्याने पूर्वनियोजित केलेल्या तीन नातेवाईकांना लोकेशन, एसएमएस व नोटिफिकेशनद्वारे अॅलर्ट पाठवले जाते. या अलर्टमध्ये एक सायरन सुद्धा वाजतो ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आसपासचे लोकसुद्धा सतर्क होतात.
तसेच, या ॲपद्वारे थेट पोलिस (100), महिला हेल्पलाइन (1091), अग्निशमन (101), रुग्णवाहिका सेवा (108) आणि इतर महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे केवळ घरच्यांनाच नव्हे, तर अधिकृत मदत यंत्रणांनाही तात्काळ माहिती पोहोचते.
बालसुरक्षेसाठीही या ॲपमध्ये विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. पालक त्यांच्या मुलांच्या मोबाईलवरील सर्च हिस्टरी तपासू शकतात, अभ्यासाच्या वेळेसाठी अलार्म लावू शकतात आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांवर देखरेख ठेवू शकतात. विशेष म्हणजे SOS बटण एकदा दाबल्यानंतर तब्बल एक तासापर्यंत जीपीएस ट्रॅकिंग सुरू राहते, ज्यामुळे नातेवाईक संबंधित व्यक्तीचे ठिकाण रिअल टाइममध्ये पाहू शकतात.
हा उपक्रम साकळी ग्रामपंचायतीकडून ग्रामीण भागातील डिजिटल सुरक्षेसाठी एक क्रांतिकारी पाऊल मानला जात असून, इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा देणारा आहे. सुरक्षितता आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणाऱ्या या ॲपमुळे गावातील महिलांमध्ये नवे आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने गावपातळीवर जनजागृती मोहीमही हाती घेतली असून, प्रशिक्षण सत्रांद्वारे महिलांना ॲपचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले जात आहे.
“ALERTO SOS” ॲप हे ग्रामीण सुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक मजबूत पाऊल ठरत असून, महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत एक आदर्श मॉडेल म्हणून साकळीचा उल्लेख आता होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.



