बोकडला धक्का दिल्यावरून कारचालकाला बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील पारधीवाडा बोकडला धक्का दिल्याच्या संशयावरून कारचालकाला बेदम मारहाण करून कारचे नुकसान केले तर त्याच्या आईला शिवीगाळ करत गळ्यातील ८ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल जबरी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रशांत समाधान नेरकर (वय-२६, रा. रोटवद ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मार्केटिंगचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास प्रशांत नेरकर हे कामाच्या निमित्ताने त्यांच्या आईसोबत कार क्रमांक (एमएच १९ इजी २०१७) मधून चोपडाकडे जाण्यासाठी धरणगाव शहरातून जात होते. दरम्यान पारधीवाडा अचानक कारसमोर एक बोकड आला.

कारने बोकडला धडक दिल्याचा संशयावरून या परिसरातील अज्ञात तीन जणांनी येऊन प्लास्टिक पाईप व काठीने बेदम मारहाण करून कारचे मोठे नुकसान केले. यामध्ये प्रशांत नेरकर हे जखमी झाले तसेच त्यांच्या आईला इतर जणांनी शिवीगाळ करत त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल जबरी ओढून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कारचालक प्रशांत नेरकर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content