अज्ञात दुचाकीच्या धडकेत ४ वर्षाची चिमुकली गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट येथील हनुमान मंदिरात आरती करुन आईवडीलांसोबत घरी जात असलेल्या चिमुकलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना जयकिसनवाडी येथे शनिवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धनश्री राजेश पांन्डे (वय ४) ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जयकिसन वाडी परिसरात राजेश महेश पांन्डे हे वास्तव्यास असून ते शनिवारी १३ जानेवारी रोजी त्यांची चार वर्षाची मुलगी धनश्रीला घेवून गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती करुन ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पायी घराकडे जात असतांना पद्मालय रेस्ट हाऊसकडून (एमएच १२ ईझेड ८७२६) क्रमांकाच्या दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात होता. त्याने चिमुकल्या धनश्रीला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात झाल्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. अपघातात चिमुकली धनश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी राजेश पान्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content