मुंबई: वृत्तसंस्था । राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे लाखो हेक्टवरील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत.
शेतकऱ्यावर झालेला हा मोठा आघात असून शासनाच्या मदतीकडे सारेच आस लावून बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही विभागांतील स्थितीचा आढावा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. ३२५६ घरांचे नुकसान झाले असून, सुमारे ४० हजार ३६ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ८७ हजार ४१६ हेक्टर जमिनींवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सात व्यक्ती असून, एकजण बेपत्ता आहे. साताऱ्यामध्ये दोघांचा मृत्यू, सांगलीत सहा जणांचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता आहेत. सोलापूरमध्ये १४ मृत आणि चार बेपत्ता झालेत.
पुणे जिल्ह्यात २६५ पक्की घरे आणि शंभर झोपड्यांची पडझड झाली. साताऱ्यात २६७, सांगलीत ३६५, सोलापूरमध्ये २२५६ आणि कोल्हापूरमध्ये तीन घरांचे नुकसान झाले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यातील ६२२१, साताऱ्यात २१३, सांगलीत १०८१ आणि सोलापूरमध्ये ३२५२१ जणांचा समावेश आहे.
अतिवृष्टीमध्ये जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पुणे जिल्ह्यात १५३, साताऱ्यात ११, सांगलीत २८, सोलापूरमध्ये ८२९ जनावरे मृत्युमुखी पडली. कोल्हापूरमध्ये पशुधनाचे नुकसान झाले नाही. . भात, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, सूर्यफूल, मका, केळी, पपई या पिकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील १८ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिके पाण्याखाली गेली. साताऱ्यात १४२० हेक्टर, सांगलीत ८२७६ हेक्टर, सोलापूरमध्ये ५८५८१ हेक्टर आणि कोल्हापूरमध्ये ३९३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात भीमेला पूर आला. या पुरामुळे शहर आणि तालुक्यातील तब्बल ३३०५ घरांमध्ये पाणी शिरले असून घरांचे आणि शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारनंतर उजनीतून येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपूरचे पाणी ओसरण्यास रात्री उशिरापासून सुरुवात झाली
दोन दिवसांपासून पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले होते. चंद्रभागेवरील नवीन पूल व अहिल्या पुलावर पाच फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने शहरातून एकाही वाहनाला बाहेर पडता येत नव्हते . स्थलांतरित नागरीकांना श्री विठ्ठल मंदिर समितीने दोन वेळचे जेवण दिले आहे.
कोयना एक्स्प्रेस रद्द
सांगली: सांगली ते पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे-वसगडे गावाजवळ अतिवृष्टीने येरळा नदीवरील रेल्वे पुलाचा भराव खचला. या घटनेमुळे मध्य रेल्वेने शुक्रवारी धावणाऱ्या कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द केल्या. निजामुद्दीन एक्स्प्रेस पंढरपूरमार्गे वळवण्यात आली गोंदियाहून निघालेली कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सातार्यारत थांबवण्यात आली.