फैजपूर येथे समरसता महाकुंभ नियोजन सभा

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशातील विविध संप्रदायांमध्ये असलेला भेदभाव नष्ट करून तसेच जातीपातीतील भेदाभेद दूर करत त्यांच्यामध्ये एकोपा व समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने निष्कलंक धाम वढोदे येथे दि.२९, ३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी समरसता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नियोजनासाठी दिनांक १३ नोव्हेंबर २२ रोजी निष्कलंकधाम वढोदा येथे सभा घेण्यात आली. यासभेत विविध समित्यांचे गठन करून समरसता महाकुंभाच्या प्रचार प्रसारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतीक चिन्हाचे (लोगो) अनावरण अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री श्री श्री राधे बाबा इंदोर, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, हभप नितीनजी महाराज व ट्रस्टी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समरसता महा कुंभासाठी देणगी देणाऱ्यांच्या सुविधा होण्याच्या दृष्टीने क्यू आर कोडचे सुद्धा अनावरण याप्रसंगी करण्यात आले. सतपंथ मंदिर संस्थान फैजपूरचे ४२५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने तसेच जनार्दन महाराज यांच्या दीक्षाविधीला पंचवीस वर्षे पूर्ण होणे, अखिल भारतीय संत संमेलनाच्या दशाब्दी निमित् व सतपंथ मंदिराचे पूर्वाचार्य ब्रह्मलीन जगन्नाथजी महाराज यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त समरसता महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत तुलसी हेल्थ केअर या निसर्गोपचार केंद्राचे लोकार्पण देशभरातील संतांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या श्री जगन्नाथ गोशाळेचे स्थलांतर होत असल्याने गोशाळेच्या नियोजित जागेचे भूमिपूजन सुद्धा याप्रसंगी संतांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याचे जनार्दन महाराज यांनी सांगितले.

२९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसात चालणाऱ्या समरसता महाकुंभाची रूपरेषा महाराजांनी स्पष्ट केली व त्यासाठीचे नियोजन उपस्थित संत व मान्यवरांसमोर मांडले. यावेळी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील सातशे स्वयंसेवक या नियोजन सभेस उपस्थित होते. नियोजन सभेस अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री श्री श्री राधे बाबा इंदोर तसेच ह भ प नितीन जी महाराज यांनी उपस्थिती देत समरसता महा कुंभाच्या माध्यमातून विविध संप्रदायांना जोडण्याचं कार्य जनार्दन महाराज करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रेरणापीठ पिराणा अहमदाबादचे ट्रस्टी देवजीभाई पटेल यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित स्वयंसेवकांना हा महाकुंभ यशस्वी करण्याचे आवाहन केले. व आपण सर्व तन-मन-धनाने समर्पित वृत्तीने यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. उपस्थित स्वयंसेवकांशी चर्चा करून समरसता महाकुंभासाठी विविध समितीचे गठन करण्यात आले. यात मुख्यत्वे आयोजन समिती, निवास व्यवस्था समिती, पार्किंग व्यवस्था समिती, व्यासपीठ समिती, भोजन समिती, साऊंड व लाईट सिस्टीम समिती आदींसह ३५ समित्यांचे गठन करण्यात आले. अखिल भारतीय धर्म संमेलना सारखेच समरसता महाकुंभ यशस्वी होण्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन सर व नरोत्तम भाई पटेल यांनी केले.

Protected Content