अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा : मविआ सरकार इतिहासजमा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार इतिहासजमा झाले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. दरम्यान हे पत्र अतिशय तातडीने पाठवण्यात आले असून ही चाचणी पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सकाळीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर सुप्रीम कोर्टाने दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कागदपत्र पुरवण्याचे सांगत सायंकाळी पाच वाजता यावर सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार यावर सुनावणी झाली. यात साडेतीन तास युक्तीवाद झाल्यानंतर न्यायमूर्तींनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे उद्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, मी आपल्याला सांगितले होते की, आपल्याला पुढे जायचे आहे. सरकार म्हणून आपण काय केले हे विचारण्यात येते. पहिल्यांदा रायगडला निधी देऊन सरकारची सुरूवात केली. यानंतर शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. आताही पीक विम्याचा ग्रीड पॅटर्न लागू केला. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही बाळासाहेबांची इच्छा होती. यासोबत उस्मानाबादला धाराशीव नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्ठी आपण केल्या आहेत. मात्र कुणाची दृष्ट लागली हे आपण जाणत आहेत. मात्र आज कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील सहकार्‍यांना धन्यवाद द्यायचे आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी खूप सहकार्य केले. आज नामांतराच्या ठरावाला कुणीही विरोध केला नसल्याची बाब लक्षणीय असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नामांतराला ज्यांचा विरोध आहे असे भासविले जात होते, त्यांनी सहकार्य केले. शिवसेनेला ५६ वर्षे झालीत. लहानपणापासून मी शिवसेना पाहत होता. आजवर पानटपरी, रिक्षावले अगदी हातभट्टीवालेसुध्दा माणसे आम्ही मोठी झाली. माणसे मोठी झाली आणि तेच विसरायला लागली. आज सुध्दा सर्व काही दिले ती लोकं नाराज असल्याची आवई उठविण्यात आली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अनेक जण लढण्याची उमेद देत आहेत. ज्यांना दिले त्यांनी दगाबाजी केली आणि नाही दिलेत ते उमेद देत आहेत. हीच शिवसेना आहे. आज न्यायालयाने दिलेला निकाल हा मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने फ्लोअर टेस्ट होणार आहे. राज्यपाल महोदयांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्याचा निर्णय तात्काळ घेतला. मात्र आमदारांचा निर्णय प्रलंबीत ठेवण्यात आला.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने बाहेरून पाठींबा देण्याचे जाहीर केले. आपली नाराजी असली तरी मला स्वत:ला कुणी सांगितलेच नाही. मुंबईत मोठा फौजफाटा जमा केला जात आहे. शिवसैनिकांना नोटीसा दिल्या जात आहेत. मात्र शिवसैनिकांनी संयम पाळावा. उद्या लोकशाहीचा पाळणा हलत आहे. उद्या फ्लोअर टेस्ट असून कुणाकडे किती आहेत हे सर्वांना माहित आहे. डोकी कशासाठी मोजायची ? मला यात जराही रस नाही. मला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही. यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदासोबत आपण आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांचे आभार मानले.

Protected Content