कोरोनाचा संसर्ग आटोक्यात : लवकरच होणार पूर्ण अनलॉक

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाचा संसर्ग ओसरतांना दिसत असल्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्यभरासह मुंबईतही कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.   अजूनही दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटयगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तोपर्यंत लसीकरणही पूर्ण झालेले असेल. यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण इतके जास्त होते की, डिसेंबरच्या सुरुवातीला २०० ते २५० पर्यंत नोंदवली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट २० हजारांवर पोहोचली. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा निर्बंध कठोर करावे लागले. मात्र सर्वाधिक रुग्णवाढीची तिसरी लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी उठवली आहे. शिवाय चौपाटया, मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट सध्या ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत.

मुंबईत गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला असून दुसरा डोस ९६ टक्के पूर्ण झाला आहे. यामध्ये १८ वर्षांपुढील वयोगटातील सर्व सुमारे ९२ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील ९ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे ३ लाख जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर मार्चपासून केंद्र सरकार आणि आयसीएमआरने परवानगी दिल्यास १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Protected Content