भारतात समूह संसर्गाला सुरूवात, स्थिती बिघडली : आयएमए

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचे १० लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली असून परिस्थिती भयावह असल्याचा इशारा ‘आयएमए’ म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

 

 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. के मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात ३० हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागात देखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झाले आहे. करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाउन लागू केला होता. चार टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, डॉक्टर मोंगा यांनी म्हटलं आहे की, कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार? अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content