पारोळा प्रतिनिधी । वाढीव वीज बिलांच्या विरोधीत नगरसेवक पी.जी. पाटील यांनी मोर्चा काढला असून बील कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात स्वीकृत नगरसेवक पी. जी. पाटील यांनी आज बालाजी मंदिरापासून विज बिल विरोधात मोर्चा काढला. या मोर्चात शहरवासीयांना वीज बिलाची प्रत घेऊन येण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात नगरसेवक पी.जी. पाटील यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावेत अन्यथा आम्ही पुढच्या वेळेस तीव्र आंदोलन करू असे सांगितले. या मोर्चाची सांगता शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आली. तदनंतर पारोळा शहराचे वीज वितरण कंपनीचे उप अभियंता यांना नगरसेवक पी.जी. पाटील यांनी व शहरवासीयांनी निवेदन दिले.
या निवेदनात वाढीव विज बिल कमी करणे; वीज कंपनीचे शहर कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यान्वित करणे; ऑनलाईन व ऑफलाईन मधील भोंगळ कारभार थांबविणे.वीज बिल भरणा केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करणे; वीज ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे न देता योग्य मार्गदर्शन करून तक्रारीचे निवारण करावे या मागण्यात करण्यात आल्या आहेत. या समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.