लंडन वृत्तसंस्था । हायड्रोजन इंधनाचा वापर करण्यात आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाने यशस्वी उड्डाण केले. जागतिक पातळीवरील विमान उद्योगासाठी हे मोठे यश समजले जात आहे. या विमानाला ब्रिटीश एअरोस्पेस स्टार्टअप कंपनी ZeroAvia यांनी डिझाइन केले आहे.
ZeroAvia च्या सहा आसनी Piper M-ass प्रवासी विमानाने उत्तर लंडनपासून जवळपास ५० मैल अंतरावर असलेल्या क्रॅनफिल्ड विमानतळावरून उड्डाण घेतले. या दरम्यान विमानाने हायड्रोजन इंधनाच्या वापराने केवळ टेक ऑफच केले नाही तर फुल पॅटर्न सर्किट पूर्ण करत शानदार लँडिगदेखील केले.
कंपनीने म्हटले की, हायड्रोजन इंधनावर आधारीत असलेल्या वाणिज्यिक श्रेणीच्या विमानाचे हे जगातील पहिले उड्डाण आहे. ZeroAvia कंपनीचे सीईओ वॅल मिफ्तखोव यांनी सांगितले की, याआधीदेखील काही विमानांमध्ये हायड्रोजन इंधनाचा वापर करण्यात आला होता. मात्र, व्यावसायिकदृष्ट्या पहिल्याच प्रवासी विमानाने आता उड्डाण केले आहे.
ZeroAvia चे पहिले हायड्रोजन विमान HyFlyer प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पात अनेक कंपन्या सहभागी आहेत. यामध्ये ब्रिटीश सरकारने मध्यम श्रेणीच्या लहान विमानांना डीकार्बोनायज करण्याच्या उद्देश्याने पाठिंबा दिला आहे. Piper M-ass या वर्षी जून महिन्यात बॅटरी पॉवर्ड टेस्ट फ्लाइट पूर्ण केले.
हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणीयदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. हायड्रोजन इंधनामुळे वायू प्रदुषणात घट होणार असून पारंपरीक इंधनालाही पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याच्यावरचे अवलंबित्व कमी होणार आहे.
पुढील वर्ष २०२१ वर्षाच्या अखेरीस या विमानाची उड्डाण क्षमता वाढवून २५० मैल इतकी करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे हे विमान न्यूयॉर्क ते बोस्टन आणि लॉस एंजलिस ते सॅन फ्रॅन्सिस्को या दरम्यान उड्डाण घेण्यास सक्षम होणार आहेत. या मार्गांवर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असतो.