चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास उणे ११ टक्के

 

मुंबई : वृत्तसंस्था । चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास उणे ११ टक्के होईल, असे भाकित इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन अॅण्ड क्रेडिट रेडिंग एजन्सी अर्थात इक्राने वर्तवले आहे. यापूर्वी या संस्थेने चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी उणे ९.५ टक्के राहील असे म्हटले होते.

कोरोनाचे संकट दूर न झाल्यामुळे आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच जात असल्याने जीडीपीचा सुधारित दर काढावा लागल्याचे संस्थेने म्हटले आहे. काही विश्लेषकांनी अर्थव्यवस्था उणे १४ टक्क्यांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने अद्याप जीडीपीचा अंदाज व्यक्त केलेला नाही. केवळ अर्थव्यवस्थेत घट होईल, असे म्हटले आहे.

२०२१मधील पहिल्या तिमाहीतीली आकडा आणखी खालावला, तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी म्हटले आहे, ‘कोरोनाची साथ सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. अर्थतज्ज्ञही या संकटाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रदीर्घ साथीमुळे आधी आम्ही जो अंदाज व्यक्त केला होता, त्यात बदल होत आहे.’

संस्थेने तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीचाही सुधारित अंदाज वर्तवला आहे. या तिमाहींमध्ये अर्थव्यवस्था ५.४ आणि अडीच टक्क्यांनी घटेल. पूर्ण वर्षातील घट अकरा टक्क्यांच्या घरात असेल. प्रवास, पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये सुरक्षित वावर राखणे कठीण असते, त्यामुळे त्याचा परिणाम अंतिमत: अर्थव्यवस्थेवर होतो. तसेच, या साथीमुळे अस्थिरता आणि आरोग्याच्या चिंतेमुळे गुंतवणुकीवर दीर्घ काळ परिणाम होईल.’

Protected Content