मुंबई (वृत्तसंस्था) त्यांनी मला क्वारंटाईन केले असे मी म्हणणार नाही, तर त्यांनी चौकशीच क्वारंटाईन केली. बिहार पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळे आणले गेले, असा आरोप बिहारचे आयपीस अधिकारी विनय तिवारी यांनी केला आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांची क्वारंटाइनमधून सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनय तिवारी यांनी मला नाही तर तपासाला क्वारंटाइन करण्यात आले होते अशी टीका केली. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशी प्रभावित झाली. त्यांनी प्रक्रियेनुसार मला क्वारंटाईन केले, पण चौकशीत अडचणी आल्या. कोणत्या ना कोणत्या निकालापर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न होता, पण आता ही चौकशी दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत होणार आहे. त्यांची नेमकी इच्छा काय होती, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विनय तिवारी यांनी दिली.