बँकेचे एटीएम फोडून पैसे लांबविण्याचा प्रयत्न फसला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावातील आरबीएलचे एटीएमचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार, ३ ऑक्टोंबर रोजी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील तीन चोरटे कैद झाले आहेत.

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे आरबीएल बँक असून या बँकेच्या शेजारीच एटीएम मशीन लावले आहे. याठिकाणी गोपाल बाविस्कर हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता गोपाल बाविस्कर हा सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे कामावर असला. यावेळी त्याने एटीएम मशीन चेक केले असता, मशीनरचा लॉकचा दरवाजा उघडा दिसला. याने ही बाब तातडीने बँकेचे मॅनेजर सोहेल मुख्तार देशमुख यांना फोनवरुन कळवली. त्यानुसार नेमकी घटना काय आहे जाणून घेण्यासाठी बँक मॅनेजर सोहेल देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. यादरम्यान एटीएममशीन मशीन मधील इतर कोणेतेही पार्ट उघडे नसल्याचे समोर येवून एटीएममधील रक्कम सुरक्षित असल्याचे समोर आले. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर सोहेल देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेचे मशीनचा दरवाजा तोडून, नुकसान करुन तसेच चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदतसर काजी हे करीत आहेत.

Protected Content