नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी कारागृहातच अलगीकरणाची व्यवस्था !

जळगाव (प्रतिनिधी) कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज कारागृहात नव्याने दाखल होणा-या नवीन बंद्यांना अलगीकरण (Isolation) करण्यासाठी जळगाव जिल्हा कारागृहाचे आवारातील “कलाभवन, कारागृह न्यायालय हॉल” हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो तात्पुरते कारगृह म्हणून जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी घोषित केले आहे.

 

अधिक्षक, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी कारागृहात नव्याने दाखल होणा-या नवीन बंद्यांना कोव्हिड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरीता त्यांची व्यवस्था नमूद केलेल्या ठिकाणी करावी. तसेच नवीन दाखल होणा-या बंद्यांची जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचे मार्फत कोव्हिड -19 चाचणी करुन घेण्यात यावी व सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार कारागृहातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी.

 

त्याचप्रमाणे सद्य:स्थितीत कारागृहात उपलब्ध असणा-या सर्व बंद्यांची 100 टक्के कोव्हिड-19 विषाणु चाचणी करुन घ्यावी. त्याकरिता आयुक्त, जळगाव शहर महानगर पालिका, जळगाव व जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेशी समन्वय साधून आवश्यक ते सहकार्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक, जळगाव यांनी जिल्हा कारागृह, जळगाव येथे तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या पोलीस कर्मचारी/ होमगार्डस यांची तात्पुरत्या स्वरुपात बंदोबस्ताकामी नेमणूक करावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

Protected Content