जळगावात सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । सराईत गुन्हेगाराने रविवारी दुपारी शनी पेठ पोलीस ठाण्यात धारदार पट्टीने हातावर वार करून उपचाराच्या ८ ते १० गोळ्या सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान गुन्हेगाराविरोधात शनीपेठ पोलीसात ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) असे या गुन्हागाराचे नाव आहे. रविवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात सिध्दार्थ बैसाणे हे ठाणे अमलदार म्हणून कार्यरत होते तर सहायक फौजदार किरण पाठक, धनंजय येवले, संदीप माने, रमेश येउलकर, होमगार्ड सर्फराज पिंजारी व सुजाता ठाकूर असे पोलीस ठाण्यात हजर असताना सागर हा तेथे आला व त्याने सिध्दार्थ बैसाणे यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे दिले नाहीत तर मी पट्टी मारुन घेईल व तुमचे नाव कोर्टात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना सांगेल असे धमकावू लागला. यावेळी बैसाणे व इतर सहकाऱ्‍यांनी त्याची समजूत घालून घरी रवाना केले. त्यानंतर तो पुन्हा साडे तीन वाजता आला व पैसे देत नसल्याने औषधोपचाराच्या ८ ते १० गोळ्या सेवन करुन धारदार पट्टीने स्वत:च्या हातावर पट्टीने वार केले.दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात नेले, मात्र त्याने तेथे उपचारास व दाखल होण्यास नकार दिला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सिध्दार्थ बैसाणे यांच्या फिर्यादीवरुन सागर याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content