प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यासाठी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यासाठी आज कर्मचारी कृती समितीने प्र. कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यने खळबळ उडाली आहे.

प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर आणि कर्मचारी कृती समितीतील वादा आता मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. पदनामबदल केलेले शासन निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे बाधीत कर्मचारी व अधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, त्यामध्ये स्वतः डॉ. एस. आर. भादलीकर हे देखील बाधित आहेत. अशा परिस्थितीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती आवश्यकता नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना लेखी स्वरुपात पाठवल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

कर्मचार्‍यांच्या गोपनीय माहितीचा दुरुपयोग होईल अशा पध्दतीचे वर्तन तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१) (जे) चे उल्लंघन झालेले असल्यामुळे त्यांना प्र. कुलसचिव पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने कृति समितीने लेखी स्वरुपात राजीनामा मागीतलेला आहे. याबाबत प्रभारी कुलगुरूंकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

या अनुषंगाने आज प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्या दालनासमोर कर्मचारी कृती समितीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून भादलीकर यांना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एन मुक्तो या संघटनेने देखील एस.आर. भादलीकर यांच्या विरूध्दच्या कारवाईसाठी या आंदोलनास पाटींबा दिला आहे. संघटनेचे प्रा. अनिल पाटील यांनी याबाबतचा पाठींबा जाहीर केला आहे. या वेळी प्रा अनिल पाटील, प्रा इ जी नेहते, प्रा के जी कोल्हे, प्रा नितीन बाविस्कर,प्रा प्रविण बोरसे, प्रा सचिन नांन्द्रे, प्रा वासुदेव वले,सुरेश चव्हाण व वैशाली वराडे इ. एन मुक्तो संघटनेचे पदाधिकारी हजर होतेयामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढणार असून या मागणीबाबत प्रभारी कुलगुरू काय निर्णय घेतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content