Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार शेतकऱ्यांच्या 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार शेतकऱ्यांच्या 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी


जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 74 हजार 494 शेतकऱ्यांचा तब्बल 25 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

 

जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड यांनी म्हटले आहे, की जळगाव जिल्ह्यात कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम (सीसीआय) व खासगी बाजार समितीतर्फे कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे.

 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार कापूस विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी 40 हजार 839 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात कापूस खरेदी सीसीआय यांच्यामार्फत 11 तालुक्यात एकूण 14 जिनिंग-प्रेसिंग मध्ये तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत चार तालुक्यात 14 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कोरोना विषाणू विषयक राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शेतकऱ्यांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस 5110 ते पाच हजार 355 या भावाने खरेदी करण्याचे काम सुरू आहे. 24 जुलै 2020 अखेर जिल्ह्यातील 25 हजार 90 शेतकऱ्यांचा सात लाख 85 हजार नऊशे आठ क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. यापैकी 9920 शेतकऱ्यांचा एक लाख 36 हजार 230 क्विंटल कापूस covid-19 चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर खरेदी केलेला आहे. पणन महासंघातर्फे 27 हजार 682 शेतकऱ्यांचा नऊ लाख 66 हजार 301 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. त्यापैकी सात हजार 667 शेतकऱ्यांचा दोन लाख 73 हजार 171 क्विंटल कापूस हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे, तर खासगी बाजार समिती मार्फत 24 जुलैअखेर 8586 शेतकऱ्यांचा दोन लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 701 शेतकऱ्यांचा 21 हजार 449 क्विंटल कापूस कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे 40 हजार 839 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी 17 हजार 527 शेतकऱ्यांचा कापूस 24 जुलैअखेर पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतक-याचा कापूस खरेदी केला गेला पाहिजे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आग्रही राहिले असून तशा सुचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी,जळगाव यांनी 23 मे 2020 रोजीच्या आदेशाने बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नाव-नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पंचनामे करण्यात येत असून पंचनामानुसार कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदीची प्रक्रिया 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत विहित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

कापूस शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या कापूस खरेदीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील, जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी वेळोवेळी सहकार, पणन व सीसीआयच्या अधिका-यांच्या आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार पुढील खरेदीची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound