Home अर्थ कोकणात पाच हजार कोटींचे नुकसान, सरकारने तातडीने मदत करावी – सुनील तटकरे

कोकणात पाच हजार कोटींचे नुकसान, सरकारने तातडीने मदत करावी – सुनील तटकरे


रायगड वृत्तसंस्था । निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचे नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना ५ हजार कोटींची मदत करावी. याशिवाय पंचनाम्याआधी सरकारने तातडीने ५०० कोटींची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याची पाहणी केली. त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त भागासाठी ५ हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणात साधारणत: ५ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. यामध्ये सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचा समावेश आहे. माझी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हीच मागणी राहणार आहे की, नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदतीचं धोरण ठेवलं पाहिजे, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

पंचनामे इतक्या मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकणार नाही म्हणूनच मोबाईलवरचे फोटो पंचनाम्यासाठी गृहित धरावे. छोट्या व्यवसायिकांचं, गणेश मूर्तिकारांचं नुकसान झालं आहे. या सर्वांना पॅकेज जाहीर करुन सरकारने मदत केली पाहिजे, पंचनाम्याआधी सरकारने तातडीने १० ते १५ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, सरकारकारने पंचनाम्याआधी तातडीने ५०० कोटींची मदत केली पाहिजे, असं सुनील तटकरे म्हणाले.


Protected Content

Play sound