खेडीरोड परिसरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोड परिसरातील ज्ञानदेव नगरातील ३८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात पंख्याला सुताच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जूना खेडी रोड परिसरातील सुनंदिनी पार्कमधील ज्ञानदेव नगरात संतोष रामदास पाटील (माळी) (वय 38) हे पत्नी व आईसोबत वास्तव्यास होते. त्यांची सोनल टेंन्ट हाऊस म्हणून लग्नाकार्यासाठी लागणारे साहित्याचे दुकान होते. आज सकाळी साडेआठ वाजेपूर्वी कुटूंबियाना बाथरुमला जावून येतो असे सांगून संतोष पाटील हे घराच्या वरच्या मजल्यावर गेले. त्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला सुताने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराचवेळ झाला तरी पती बाथरुमवरुन का आले नाही हे बघण्याठी त्यांची पत्नी या वरच्या मजल्यावर आल्या. परंतू दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांचे लक्षात आले.

दरवाजा तोडल्यानंतर उघडकीस आली घटना
घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजताच संतोष यांच्या पत्नीने त्याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाला बोलविले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता त्यांना घरात संतोष यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. हे बघताच त्यांच्या पत्नीसह कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.संतोष यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामूळे केली याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळून आली नाही. पुढील तपास अभिजीत सैंदाणे कहे करीत आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content