पेट्रोल-डिझेलनंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचीही दरवाढ

पुणे वृत्तसंस्था । राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची दरवाढ झाली असतानाच देशात घरगुती गॅसचीही भाववाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात साडेअकरा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरूवातीला नागरिकांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

१४.२ किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची वाढीव दराने विक्री होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना विनाअनुदानित गॅससाठी ११.५० अधिक मोजावे लागतील, तर १९ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत तब्बल ११० रुपयांनी वाढली आहे. कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. आधीच पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढले होते. त्यात गॅसची किंमतही वाढल्याने नागरिकांच्या आर्थिक संकटात वाढ झाली.

पुण्यात पूर्वी विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर ५८२ रुपये होता, आता तो ५९३.५० वर पोहचला आहे. अहमदनगरला ५९३ वरुन ६०४.५० रुपयांवर गेला. तर १९ किलो ग्रॅमचा सिलेंडर १०५५ वरुन ११६५ रुपयांवर गेला आहे‌. प्रत्येक शहरातील स्थानिक कर पद्धती आणि वाहतूक यानुसार सिलेंडरची किंमत काही फरकाने कमी-अधिक असू शकते.

पेट्रोल-डिझेलही महागले
मुंबईत पेट्रोलचे दर ७६.३१ रुपयांवरुन ७८.३१ रुपयांवर गेले आहेत. तर मुंबईतील डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून ६८.२१ रुपयांवर गेले आहे. देशभरात लॉकडाऊन झाल्याने कमी झालेला महसूल भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

Protected Content