अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवस गावाजवळ वाळू तस्करांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यात तीन तलाठी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, वाळू माफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. याची प्रचिती बुधवारी रात्री अमळनेर तालुक्यातील घटनेतून दिसून आली आहे.या तालुक्यातील वाळू चोरांना आळा घालण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकातील तलाठी प्रथमेश पिंगळे, हर्षवर्धन मोरे, धीरज देशमुख, आशिष पारधी, पुरुषोत्तम पाटील, स्वप्नील कुलकर्णी, पिंटू चव्हाण, जे.ए.जोगी यांना बुधवारी रात्री कळंबू येथून भरवस गावाकडे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार हे पथक भरवस गावाकडे गेले. गावाचा जवळच बेटावद येथील बबलू राजेंद्र तायडे व त्याच्या सोबत अन्य ७ ते ८ जण ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करत असल्याचे आढळले. पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बबलू तायडे यांच्यासह इतरांनी या पथकावर हल्ला चढविला. यात धीरज देशमुख, हर्षवर्धन मोरे व आशिष पारधे आणि पी.एस.पाटील हे जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी जखमींची ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली.