नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार; वन अधिकारी जखमी

 

नाशिक(प्रतिनिधी) शहरातील सावरकरनगर परिसरात रविवारी बिबट्याचा थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. सकाळी ९ वाजेपासून बिबट्याने या भागात दर्शन दिले होते. त्यानंतर वन विभागाचे बचाव पथक परिसरात दाखल झाले. मात्र, सावरकर नगरमध्ये बिबट्या कुठे दडून बसला होता, हे शोधणे कठीण बनले होते. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला आहे.

सुमारे चार तास शोध मोहीम राबूनही बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. त्यामुळे पुन्हा परिसरात घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाचे पथक याच भागात असल्यामुळे तत्काळ त्याचा माग काढणे, बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार बिबट्याचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. सावरकर नगर हा परिसर गोदावरी काठापासून जवळ असल्यामुळे या भागात बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असावा आणि पहाट झाल्यावर दडून बसला, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. २५ जानेवारी रोजी याच परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यश आले होते. त्यावेळी देखील बिबट्याने सावरकर नगर भागामध्ये धुमाकूळ घातला होता. नागरिकांच्या गोंगाट व दगडफेक यामुळे बिबट्या बिथरला होता.

Add Comment

Protected Content