भाजपने युतीधर्माचे पालन केले नाही- ना. गुलाबराव पाटील

gulabrav patil

एरंडोल प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत भाजपने युतीधर्माचे पालन केले नसले तरी मतदारांनी त्यांना जागा दाखविली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते येथील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.

कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने एरंडोलमध्ये शिवसेनेने आयोजित नागरी सत्कारावेळी ते बोलत होते. ना. पाटील यांचे एरंडोलमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर पालकमंत्री पाटील व आमदार चिमणराव पाटील यांचा विविध संस्था, पदाधिकार्‍यांनी सत्कार केला. याप्रसंगी पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, जि.प. सदस्य डॉ.हर्षल माने, पाचोर्‍याचे नगराध्यक्ष संजय गोहील यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय जिवनाचा श्रीगणेशा एरंडोल तालुक्यापासून झाल्याचे सांगितले. परिवाराला कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील यांच्यासह जि.प. सदस्य नाना महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, माजी सभापती शालिग्राम गायकवाड, आनंदा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी प्रास्तविक, शहरप्रमुख कुणाल महाजन यांनी सूत्रसंचालन, तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.

Protected Content