मोदींच्या कामांची पाहणी ट्रंप कधी करणार ? : शिवसेनेचा खोचक सवाल

मुंबई प्रतिनिधी । ट्रंप दाम्पत्य हे केजरीवाल यांच्या कामांची पाहणी करणार असल्याचे नमूद करत ते मोदींच्या कामाची पाहणी केव्हा करणार ? असा खोचक सवाल आज शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखातून डोनॉल्ड ट्रंप यांच्या भारत दौर्‍यावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले व झोपडया वगैरे दिसू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेस भिंती उभारल्या गेल्या. ट्रम्प हे दिल्लीत जातील व मग त्यांचा राजकीय किंवा सरकारी दौरा सुरू होईल. अहमदाबादेत फक्त जल्लोष, पण दिल्लीत केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी ङ्गट्रम्पफ पती-पत्नी करतील. मग मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार? हा प्रश्‍न शिल्लक राहतोच.

यात पुढे म्हटले आहे की, ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेने हिंदुस्थानला विकसनशील देशांच्या यादीतून गेल्याच आठवडयात वगळले आहे. या आणि अशा काही मुद्दयांबाबत ट्रम्प काही सकारात्मक संदेश देतील का? अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल. कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळलेलाच आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदीचा कहर सुरू आहे. ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या हिंदुस्थान भेटीने हे सर्व प्रश्‍न सुटणार नाहीत. तरीही प्रे. ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत. ट्रम्प महाराज यावे, तुमचे स्वागत आहे! असे अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content