रामल्ला वृत्तसंस्था । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत पॅलेस्टाइन देशाने मंगळवारी महात्मा गांधी यांचा वारसा आणि मूल्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट फिलिस्टाइन अथॉरिटीच्या (पीए) दूरसंचार आणि माहिती विभागाचे मंत्री इसहाक सेदेर यांनी मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार यांच्या उपस्थितीत हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करण्यात आले असून महात्मा गांधीचा वारसा आणि आणि त्यांच्या मूल्यांनी मानवतेला एक मार्ग दाखवण्याचे काम केले आहे आणि पुढेही करत राहतील, अशी प्रतिक्रिया इसहाक सेदेर यांनी व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सन्मान करण्याचे हे पाऊल भारत आणि पॅलेस्टाइनदरम्यानचे मजबूत ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध दर्शवत असल्याचे सुनील कुमार यांनी म्हटले आहे. रामल्ला येथे भारतीय मिशनने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या एक वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात पॅलेस्टाइन नागरिकांनी उत्साहात भाग घेतला. जेरिको येथे जूनमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी हे फिलिस्टाइनी समाजासाठी प्रेरणेचे स्त्रोत आहेत. त्यांचा संदेश समस्त जगातील लोकांना प्रेरित करतो असे शहराचे गव्हर्नर जेहाद अबु-असल यांनी म्हटले आहे.