इस्त्रोच्या वैज्ञानिकाची हैदराबादेत निर्घृण हत्त्या

Isro scientists S suresh murder

हैदराबाद, वृत्तसंस्था | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एस.सुरेश (५६) असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. हैदराबादच्या अमीरपेठ भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये एस. सुरेश मंगळवारी मृतावस्थेत आढळले. अज्ञात आरोपीने त्यांची हत्या केली असून सुरेश हे मूळचे केरळचे असून हैदराबादमध्ये ते एकटेच राहात होते. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर विभागात ते कार्यरत होते.

 

मंगळवारी सुरेश कामावर आले नाहीत, त्यावेळी सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाइल नंबरवर फोन केला. त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर इस्रोमधल्या सहकाऱ्यांनी सुरेश यांची पत्नी इंदिरा यांना फोन करुन याबद्दल माहिती दिली, त्या चेन्नईमधील बँकेत नोकरी करतात. सुरेश यांच्या पत्नी कुटुंबियांसह लगेच हैदराबादमध्ये पोहोचल्या व त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सुरेश मृतावस्थेत खाली पडलेले होते. कुठल्यातरी जड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे सुरेश यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सुरेश गेल्या २० वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होते. त्यांची पत्नीही त्याच शहरात राहत होती. मात्र २००५ साली चेन्नईमध्ये त्यांची बदली झाली. सुरेश यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला असून मुलगी दिल्लीत राहते.

Protected Content