पिळोदा गावातून शेतकऱ्याच्या बैलजोडीची चोरी; फैजपूर पोलीसात चोरट्यांवर गुन्हा दाखल

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिळोदा गावातून एका शेतकऱ्याचा ५० हजार रूपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी खळवाडीतून चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, “ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे (वय-५५) रा.पिळोदा ता.यावल जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्या बैलजोडी आहे. सोमवार, दि.१४ फेब्रुवारी रोजी दिवसभर शेतातील काम आटोवून ते सायंकाळी त्यांच्या मालकीच्या खळवाडीत बैलजोडीला चारापाणी करून घरी निघून गेले.

मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधलेली ५० हजार रूपये किंमतीची बैलजोडी चोरून नेल्याचे मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. दोन्ही बैलांचा शोध त्यांनी संपूर्ण गावात आणि परिसरात घेतला; परंतू बैलजोडी कुठेही आढळून आली नाही. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्ररीवरून रात्री अज्ञात चोरट्यांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश सानप करीत आहे.

Protected Content