पाचोरा | तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे पोळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे करेच्या दिवशी मरीआईची यात्रा भरवली जाते. या दिवशी नंदीच्या देवळात मोठ्या प्रमाणात पूजा-अर्चा केली जाते. खेडगाव या गावाचे नाव नंदीचे का पडले असावे ? असा एक प्रश्न सतत पडत असतो, तर त्याचा एक धार्मिक इतिहास आहे.
श्रावण पोळ्याच्या दिवशी सकाळी नंदी बैल आणि मरीआईच्या देवळात नेवेद्य दिला जातो. दुसर्या दिवशी यात्रा भरते. शंभर वर्षांपुरी या गावात गुणाजी बुवा म्हणून ओळखले जाणारे एक गृहस्थ रहात होते. गुणाजी बुवा यांचे सात्विक स्वभावाचे व थोर समाजसेवक असे व्यक्ती होते. १७६० साली गावात महादेवाचे मंदिर, शाळा, गाव, चावडी अशी विकास कामे त्यांनी केली होती. त्यामुळे आजही हे गाव धार्मिक गाव म्हणून ओळखले जाते. जुन्या काळापासून आजही गावात नेहमी कीर्तन, पूजा-पाठ, प्रवचन, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव व दुर्गौत्सव परंपरेने साजरे होत आहेत. गुणाजी बुवाना गावकरी देव मानत असत, त्यांनी अंतिम समयी आपली समाधी बांधण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे गावात त्यांची समाधीही बांधण्यात आली. काही काळानंतर गावातील प्रतिष्ठित शेतकरी गोविंद स्वरूप संघवी यांच्या शेतात १९११ साली एक सालदार बैलाच्या जोडीच्या साहयाने शेती मशागत करीत असताना. तिथे एक साधू आल्याचे सागितले जाते. त्यांनी त्या सालदाराजवळ येवून सागितले की, जुंपलेल्या बैलांपैकी हा एक बैल महादेवाचा नंदी म्हणून आहे, त्याची शिंगे, तेजस्वी डोळे या सर्व अंग लक्षणाची खात्री करा, त्याला मोकळे सोडून त्याची पूजा करा, कदाचित हा नंदी तुमच्या गावाची कायापालट करू शकतो. त्याची खात्री करून देण्यासाठी त्यांनी एक नारळ मागवले, तोपर्यंत गावातील मंडळी तिथे येऊन पोहोचली होती. त्यांनी गावकऱ्यांसमोर दुकानातून नारळ मागवले व ते नारळ नंदी बैलाच्या दोन्ही शिंगांच्या मध्यभागी हलकेच ठेवले त्याक्षणी नारळाचे आपोआप दोन तुकडे झाले हे पाहून गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला गावकऱ्यांचा साधूच्या बोलण्यावर बसला. त्या साधूने पुढे सांगितले की, या नंदीच्या पोटाघालून जर कोणी आजारी व्यक्तीला काढले तर त्याचा आजार पूर्णपणे बरा होईल. त्यावेळी गोविंद संघवी यांचा मुलगा आजारी होता. त्या मुलांना कालांतराने साधूच्या सांगण्यावरून नंदीच्या पोटाखालून काढले गेले आणि त्याचा आजार बरा झाला. गावकरी त्या नंदीचे भक्त झाले आणि नंदीला नवसही बोलू लागले. काही कालांतराने नंदी बैलाने जगाचा निरोप घेतला. गावकऱ्यांना याचे खूप दुःख झाले, त्यांनी आठवण म्हणून नदीकाठी ह्या नंदीबैलाची समाधी बांधली. एके दिवशी एका मोकाट वळूने त्या समाधीची नासधूस केली. त्याचरात्री गोविंद शेठ संघवी यांना स्वप्नात नंदीने दर्शन दिले व नंदी काठाच्या वडाखाली माझी स्थापना करा, असे सांगितले. त्यानंतर राजस्थानातून नंदीची मूर्ती तयार करून आणून तिची गावात प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून गावाचे नाव खेडगाव नंदीचे असे ठेवण्यात आले. या गावात गुणाजी पाटील यांनी विकासाची सुरवात केली, त्यांच्या घराण्यातील वारसा त्यांचे नातू रघुनाथ रामचंद्र पाटील यांनी २० वर्षे गावाचे प्रमुख म्हणून सांभाळला. पुढे चालून गुणाजी पाटील यांचे पणतू पंढरीनाथ गोविंदा पाटील यांनी काहीकाळ गावचे सरपंचपदाची धुरा सांभाळली. हल्ली ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर आहेत. तसेच संघवी घराण्यातील गोविंद संघवी यांचे वंशज भागचंद संघवी, अशोक सघवी यांनीही तालुक्यात संघवी उद्योग म्हणून नाव मिळवले आहे. या गावात आजही पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहाने यात्रा भरवली जाते. यात्रेत गावकऱ्यांसाठी विविध मनोरंजनाचे, जनजागृतीचे कार्यक्रम व स्पर्धा यांचे आयोजन केले जात असते.
लेखक :- गणेश शिंदे, विभागप्रमुख, अ.भा. ग्रामीण पत्रकार संघ. मो. ९०२८८८००४५