धरणगाव नगराध्यक्ष निवडणूक शिवसेना-भाजपतच रंगणार

धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या अकाली निधनानंतर आता पालिकेच्या राजकारणात फेरनिवडणुकीची तयारी सुरु झालीय. यावेळीही शिवसेना-भाजपातच लढाई होण्याची शक्यता आहे.  तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडे बघ्याची भूमिका घेण्यावाचून पर्याय नाहीय. परंतु युती झाल्यास मात्र, राष्ट्रवादीसोबत त्यांची लढाई रंगेल,हे देखील निश्चित आहे.

 

लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या अकाली निधनानंतर फेरनिवडणूक होणार आहे. पालिकेच्या सभागृहात आजच्या घडीला सर्वधिक सदस्य शिवसेनेचे आहेत. थोडक्यात शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. तर भाजपकडेही सहा सदस्य आहेत. आजच्या घडीला भाजप-शिवसेना व्यतिरिक्त पालिकेत राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा एकही सदस्य नाहीय. त्यामुळे या दोघं पक्षांकडे बघ्याची भूमिका घेण्यावाचून पर्याय नाहीय. कारण एकही नगरसेवक नसतांना फक्त नगराध्यक्ष निवडणूक लढवून उपयोग नाहीय.

 

गतवेळी प्रमाणे यावेळी देखील शिवसेना-भाजपातच जोरदार लढाई रंगण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावेळीही प्रमुख दावेदार तालुकाध्यक्ष संजय महाजन हेच आहेत. कारण अवघ्या काही मतांनी त्यांचा गतवेळी पराभव झाला होता. अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यामुळे श्री.महाजन यांच्याबद्दल सहानभूती आहे आणि हीच सहानभूती भाजप कॅश करण्याचा प्रयत्न करेल. संजय महाजन यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. तर पालिकेतील भाजपचे गटनेते कैलास माळी हे उमेदवार होऊ शकतात. दरम्यान, संजय महाजन हे आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जातात. गतवेळीचा पराभव लक्षात घेता. यावेळी श्री. महाजन हे आक्रमकरित्याच निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब शिवसेना ओळखून असल्यामुळे त्यांचा उमेदवार देखील तगडाच राहील.

 

शिवसेनेकडून आजच्या घडीला माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या धर्मपत्नी उषाताई वाघ, माजी नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक सुरेशनाना चौधरी, विद्यमान गटनेते विनय (पप्पू) भावे, नगरसेवक वासूदेव चौधरी हे प्रमुख दावेदार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या तिघं उमेदवारांकडे नगराध्यक्षपदाचा इतिहास आहे. यात पप्पू भावे व वासू चौधरी हे बालपणीचे मित्र असल्यामुळे दोघांपैकी कुणालाही उमेदवारीचा विषय आला. तर यांची सहमती असेल. तर दुसरीकडे सुरेशनाना चौधरी जेष्ठ शिवसैनिक असल्यामुळे त्यांचा दावा देखील मजबूत आहे. परंतु गुलाबराव वाघ हे नेमकी काय भूमिका घेतात. यावर शिवसेनेचा उमेदवार ठरेल हे मात्र, निश्चित आहे.

 

 

दुसरीकडे पालिकेत कधीकाळी प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीसमोर यावेळी कोणत्यातरी एका उमेदवाराला छुपा पाठींबा देण्याशिवाय पर्याय नाहीय. किंबहुना आगामी राजकीय गणित लक्षात घेता. राष्ट्रवादी पुन्हा एकदा उमेदवार उभा करू शकते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि माजी गटनेते दीपक वाघमारे हे नेमकी काय भूमिका घेतात. त्यावर राष्ट्रवादीची रणनीती ठरेल. तर कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील हे कदाचित ऐनवेळी आपले पत्ते उघड करण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका नगराध्यक्षपदाचा उमेदवाराच्या विजय-पराजयासाठी निर्णायक ठरेल, हे देखील तेवढेच खरे आहे. राजकीय घडामोडी लक्षात घेता युती झाल्यास मात्र, राष्ट्रवादीसोबत त्यांची लढाई रंगेल. मग राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल? यावर लढाईची चुरस किती रंगतदार होईल हे ठरेल.

 

Protected Content