जळगाव, प्रतिनिधी | देशभक्ती अंतरंगात आणि मनापासून असावी. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या माध्यमातून देशभक्ती अधिक वृद्धिंगत होते. त्यासाठी गीतगायनाचा कार्यक्रम प्रेरणादायी ठरतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी शहरातील काव्यरत्नवाली चौकात देशभक्तीपर गीतांनी तरुणांमध्ये स्फुल्लिंग चेताविले. विविध वयोगटातील तरुणांनी गायलेल्या गीतांनी राष्ट्रभक्ती जागवली. युवाशक्ती फौंडेशन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ‘एक शाम देश के नाम’ हा देशभक्तीपर सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ना. महाजन यांनी संवाद साधला. प्रसंगी जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, कॅप्टन मोहन कुलकर्णी, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, मनपातील भाजपचे सभागृह नेते ललित कोल्हे, भाजपचे पदाधिकारी सुनील बढे, जनता बँकेचे संचालक संजय बिर्ला, प्रा.संजय पत्की, जितेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.महाजन यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा देत पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करा असे आवाहन केले. यावेळी काश्मीरमध्ये पूर्णवेळ कार्य करणारे अभाविप कार्यकर्ते मयूर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अभाविपमध्ये काश्मीर बचाव आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात ४० तरुणांनी देशभक्तीपर गीते सादर केली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनीही उत्स्फूर्तपणे गायिलेले चिठ्ठी आयी है या गीताने दाद मिळविली. परीक्षण प्रा.मिलिंद नवले, प्रांजली रस्से यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा उपाध्ये, हिमानी महाजन यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरी हरिमकर, आशुतोष चौधरी, द्वितीय अथर्व मुंडले, तर तृतीय पारितोषिक आरती धाडी, कामिनी खैरनार यांनी पटकाविले. कार्यक्रमासाठी युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कवडिया, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, मंजित जंगीड, उमाकांत जाधव, भवानी अग्रवाल, साजिद शेख, सौरभ कुलकर्णी, अभाविपचे प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्रा.भूषण राजपूत, रितेश चौधरी, अश्विन सुरवाडे आदींनी कामकाज पहिले.