Home Cities धरणगाव पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावात संपन्न ; ‘भक्तीनाद’च्या सुरांनी रंगली भजनसंध्या

पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावात संपन्न ; ‘भक्तीनाद’च्या सुरांनी रंगली भजनसंध्या

0
7


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथील श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळातर्फे आयोजित भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मंगलमय, भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्री गुरुपद परिसर तसेच गुरुसुमंतजी सखाराम दरबार परिसरात अखंड हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि भक्तीमय वातावरणाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली ती जळगाव येथील कलावंत तुषार वाघुळदे प्रस्तुत ‘भक्तीनाद’ भजन संध्या ग्रुपची भक्तिमय मैफिल. रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत रंगलेल्या या स्वरसोहळ्यात भजने, अभंग आणि गवळणी सादर करण्यात आल्या. या भक्तिसंगीतामुळे पोखरी परिसराला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गायक निलेश पाटील, ‘भक्तीनाद’ ग्रुपचे प्रमुख व प्रसिद्ध निवेदक-निरूपणकार तुषार वाघुळदे, गायिका जागृती इंगळे तसेच सहकलावंत प्रवीण पाटील यांनी आपल्या सुमधुर सादरीकरणातून उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. विशेषतः गवळणींच्या सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक भाविक भक्तिभावात तल्लीन होत नृत्यात सहभागी झाले.

गुरुवारी मध्यरात्री ठीक १२ वाजता टाळ-मृदंगाचा गजर, शंखनाद आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, ‘भगवान गोपालकृष्ण की जय’, ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बालकृष्णाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. या वेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णाचा जयघोष केला. विश्वकल्याणाच्या मंगलकामनेसाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा’ या मंत्राच्या १०८ आहुतींचा महायज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. यज्ञकुंडातून निघणाऱ्या पवित्र लहरींमुळे संपूर्ण आश्रम परिसर अधिकच चैतन्यमय झाला होता. या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे प्रमुख प.पू. रामदादा यांनी यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीसह विविध सण-उत्सवांचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. त्यांनी ‘भक्तीनाद’ ग्रुपचे प्रमुख, कलावंत व पत्रकार तुषार वाघुळदे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. निस्वार्थ भावनेने चांगले कार्य सुरू ठेवत असल्याबद्दल त्यांनी तुषार वाघुळदे यांचा गौरव करत उपस्थित कलावंतांचेही कौतुक केले. जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व वैष्णवांनी प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पोखरी ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound