


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात शिक्षकांची भूमिका साकारली. नववी, दहावी आणि ज्युनिअर कॉलेजमधील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिवसभर वर्ग अध्यापनापासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंतची संपूर्ण धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, आव्हाने आणि शिस्तीचे प्रत्यक्ष धडे शिकायला मिळाले.
या अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रशासकीय पदांची जबाबदारी चोख बजावली. विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून श्रुती कोष्टी, उपमुख्याध्यापिका म्हणून कृतिका राऊत, तर पर्यवेक्षक म्हणून चिराग झटके यांनी कार्यभार सांभाळला. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी आपापल्या वर्गांवर जाऊन विद्यार्थ्यांना अत्यंत रुचीपूर्ण पद्धतीने अध्यापन केले. तसेच वर्गव्यवस्थापन, शिस्त आणि शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तथा कार्याध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षक म्हणून आलेले आपले प्रातिनिधिक अनुभव मनमोकळेपणाने मांडले. डी. एन. पाटील यांनी दिवसभराच्या उपक्रमाचे बारकाईने निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या सहभागाचे मनापासून कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली आणि शिक्षकी पेशातील मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे समाधान व्यक्त केले. या सोहळ्यास शाळेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माडी, ॲड. प्रदीप देशपांडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त नशिराबाद शिक्षण मंडळाच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका सारंगी नारखेडे, प्रिया कोष्टी, श्रावणी राखुंडे व टीना धांडे यांनी केले, तर यज्ञेश टेमकर याने उपस्थितांचे आभार मानले.



