Home क्राईम वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक उघड ; दुचाकी सोडून आरोपी फरार

वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक उघड ; दुचाकी सोडून आरोपी फरार

0
4


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुड्यातील सागवान वृक्षांची अवैध तोड करून चोरट्या मार्गाने लाकडाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाई केली. वर्डी ते अडावद मार्गावर वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या गस्तीवेळी सागवानाचे अनघड बेलन वाहून नेणाऱ्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्यात आला. मात्र, आरोपीने दुचाकी व लाकूड रस्त्यावरच टाकून घटनास्थळावरून पळ काढला.

दि. ४ रोजी रात्री सुमारे ९ वाजता वनपाल योगेश साळुंखे व वनरक्षक गजानन कोईगडे यांना वरिष्ठांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वर्डी-अडावद रस्त्यावर गस्त घालण्यात येत होती. यावेळी संशयास्पदरीत्या सागवान अनघड बेलनाची वाहतूक करणारा दुचाकीस्वार वनपथकाच्या निदर्शनास आला. वनपथकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू करताच त्याने आपल्याकडील लाकूड आणि दुचाकी रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता सागवानाचे मोठे ८० नग व लहान २० नग अनघड बेलन आढळून आले. वनविभागाने घटनास्थळावरून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सागवान लाकूड असा एकूण ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल चोपडा येथे जमा करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील आणि अडावद वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक गजानन कोईगडे, सुशांत पावरा, हर्षल जोशी, वाहनचालक राजेश जोशी, राजू पाटील तसेच अडावद राऊंड स्टाफने सहभाग घेतला.


Protected Content

Play sound