


चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी चोपडा शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी येत्या दोन दिवसांत पोलीस ठाण्यातून अधिकृत कायदेशीर परवानगी मिळवून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व मंडळांनी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, धर्मदाय आयुक्त, महावितरण आणि खाजगी जागा असल्यास जागा मालकाचा नाहरकत दाखला (NOC) मिळवणे आवश्यक आहे. हे सर्व ऑनलाईन परवानगी फॉर्म आणि दाखले गोळा करून चोपडा शहर पोलीस ठाण्यात जमा करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील मोजक्याच गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली असल्याने उर्वरित सर्व मंडळांनी कोणत्याही विलंबाशिवाय तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून आपली प्रक्रिया पूर्ण करावी, उशीर झाल्यास परवानगी दिली जाणार नाही याची नोंद सर्व मंडळांनी घ्यावी.
उत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडप व परिसरात अनिवार्यपणे उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या रात्री कोणतेही मंडळ श्रीगणेशमूर्ती शहरात कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर उभी करणार नाही. मिरवणुकीच्या वेळीच मूर्ती योग्य क्रमाने (लाईनमध्ये) आणावी लागेल आणि मिरवणूक संपल्यानंतर रस्त्यावर कुठेही मूर्ती उभी ठेवता येणार नाही; या नियमांचे उल्लंघन होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकारिणीला पूर्णपणे जबाबदार धरून गुन्हे दाखल केले जातील. तसेच चोपडा नगरपरिषदेने दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे मंडळांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.



