



नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नशिराबादच्या पारंपरिक बैलपोळा उत्सवाला यंदा स्पर्धेची जोड मिळणार आहे. नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने पोळ्यानिमित्त ‘उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या बैलजोडींना रोख पारितोषिकांसह मानाचा चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा पोळा अधिक उत्साहपूर्ण आणि आकर्षक ठरणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या बैलजोडीला ७ हजार १०० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार १०० रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार १०० रुपये व चषक देण्यात येणार आहे. बैलजोडीची निवड विविध निकषांच्या आधारे करण्यात येणार असल्याने सहभागी पशुपालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धेसाठी दोन्ही बैल निरोगी व तंदुरुस्त असणे, त्यांची उंची, शरीरबांधा, रंगरूपातील सुसंगती, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यांचा विचार केला जाणार आहे. बैलांची पारंपरिक व आकर्षक सजावट, शिंगांची स्वच्छता, चालण्याची पद्धत, उभे राहण्याची ठेवण तसेच शांत आणि नियंत्रित वर्तनालाही गुणांकनात महत्त्व दिले जाणार आहे.
बैलांची योग्य देखभाल, पोषण आणि नैसर्गिक सुदृढता यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. बैलांना मारहाण, जबरदस्ती किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास देऊन स्पर्धेसाठी सादर केल्याचे आढळल्यास संबंधित बैलजोडी स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा पोळ्याच्या दिवशी केवळ नशिराबाद शहरातील रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पशुपालकांनी नशिराबाद नगरपरिषदेत आवश्यक नोंदणी करणे बंधनकारक आहे.
दरम्यान, नशिराबादच्या पोळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण असलेल्या बैलांच्या शर्यतीलाही यंदा विशेष सन्मानाची जोड देण्यात आली आहे. शर्यतीत प्रथम येणाऱ्या बैलाला नगरपरिषदेच्या वतीने मानाचा फेटा आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. परंपरा, उत्साह, बैलांची सजावट आणि स्पर्धेचा थरार यांचा संगम यंदाच्या पोळ्यात पाहायला मिळणार आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन आणि मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नशिराबादकरांसाठी यंदाचा बैलपोळा विशेष संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे.



