मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्या चार महिन्यांपासून तपासणीअभावी प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना पालक व बांधकाम कामगारांमध्ये व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, एप्रिल २०२६ पासून मुक्ताईनगर तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तपासणीच्या प्रक्रियेत अडकून पडले आहेत. या कालावधीत अर्जांची पडताळणी न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परिणामी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, जामनेर, चोपडा, अमळनेर, रावेर, भडगाव आदी तालुक्यांमध्ये अशाच प्रकारच्या अर्जांची तपासणी अत्यंत वेगाने होत असल्याचा दावा केला जात आहे. काही तालुक्यांमध्ये अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तपासणी पूर्ण केली जात असल्याचे उदाहरण समोर येत असताना, मुक्ताईनगर तालुक्यात मात्र विद्यार्थ्यांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने कामगार वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असतानाही मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती अर्जांवर निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. शासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना, स्थानिक स्तरावरील दिरंगाईमुळे ही योजना प्रभावीपणे राबवली जात नसल्याची टीका होत आहे.
संबंधित कामकाजाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी अर्जांची वेळेत तपासणी न केल्याचा आरोप बांधकाम कामगारांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी पूर्ण करावी आणि दिरंगाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी कामगार आणि पालकांकडून करण्यात आली आहे. “शासन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निधी उपलब्ध करून देते, मात्र अधिकारी वेळेत काम करत नसतील तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का भोगावी?” असा संतप्त सवाल मुक्ताईनगर तालुक्यातील बांधकाम कामगारांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



