मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील रहिवासी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश भागवत पाटील आणि डॉ. पल्लवी पाटील यांची कन्या कु. तनिष्का निलेश पाटील हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET 2026) मध्ये 720 पैकी 598 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शेमळदे गावासह संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, कोटा, लातूर, नांदेड किंवा इंदूर यांसारख्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांतील कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासचा आधार न घेता, स्वतःच्या जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर तनिष्काने हे यश मिळवले आहे. त्यामुळे तिच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तनिष्काने यापूर्वी जळगाव येथील सेंट जोसेफ स्कूलमधून CBSE बारावीच्या परीक्षेत 98.99 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले होते. शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी कायम राखत तिने आता NEET परीक्षेतही दमदार यश मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने तनिष्काने डॉक्टर होण्याचे स्वप्न जिद्दीने जोपासले. तिच्या यशामागे तिची अथक मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन, त्याग आणि प्रोत्साहन यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
तनिष्काच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शेमळदे गावासह मुक्ताईनगर तालुक्याचे नाव तिने राज्यभर उज्ज्वल केले आहे. भविष्यात ती एक यशस्वी आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून समाजसेवा करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



