वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत वरणगाव नगरपरिषदेला मोठे यश मिळाले असून, नगरपरिषदेमार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ४३ पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या प्रत्येक लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी रु. २.५० लाखांचे आर्थिक सहाय्य मिळणार असून, अनेक कुटुंबांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत वरणगाव नगरपरिषदेने पात्र नागरिकांचे प्रस्ताव वेळेत आणि आवश्यक कागदपत्रांसह शासनाकडे पाठविले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत ४३ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही शासनाकडून मंजुरी मिळावी यासाठी नगरपरिषद सातत्याने पाठपुरावा करणार असून, कोणताही पात्र नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील.

यावेळी नगराध्यक्षांनी शहरातील विविध विकासकामांबाबतही भूमिका स्पष्ट केली. वरणगाव शहरातील अतिक्रमणे नियमबद्ध आणि नियमानुसार हाताळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, नगरसेवक नाना चौधरी, वंदना पाटील, श्रद्धा गायकवाड तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी सोनवणे यांनी मंजूर लाभार्थ्यांचे अभिनंदन करताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ही सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले. अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आवश्यक त्या सर्व बाबतीत नगरपरिषद त्यांना सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरपरिषद प्रशासनाने शहरातील पात्र नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. नागरिकांना अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित विभागामार्फत मार्गदर्शन आणि आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.



