Home Cities जळगाव ICM 2026 साठी डॉ. किशोर पवार यांची निवड ; अमेरिकेत सादर करणार...

ICM 2026 साठी डॉ. किशोर पवार यांची निवड ; अमेरिकेत सादर करणार संशोधन

0
21

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी अभिमानाची बाब ठरणारी मोठी शैक्षणिक कामगिरी समोर आली आहे. विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशालेचे संचालक डॉ. किशोर एफ. पवार यांची अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय गणितज्ञ परिषद (ICM 2026) साठी निवड झाली असून, जागतिक स्तरावरील या मानाच्या परिषदेत संशोधन सादर करण्यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे २३ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणितज्ञ परिषद (International Congress of Mathematicians – ICM 2026) मध्ये जगभरातील नामांकित गणितज्ञ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेत डॉ. किशोर पवार आपल्या संशोधन निबंधाचे सादरीकरण करणार असून, त्यांना परिषदेतील एका महत्त्वपूर्ण तांत्रिक सत्राचे ‘सत्र अध्यक्ष’ (Moderator) म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळणे हे त्यांच्या संशोधन कार्याला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रतीक मानले जात आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठीच्या प्रवास, नोंदणी, निवास तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी डॉ. पवार यांना सायमन्स फाउंडेशन (Simons Foundation), इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन (IMU) आणि कमिशन फॉर डेव्हलपिंग कंट्रीज (CDC) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या अनुदानामुळे त्यांचा परिषदेतील सहभाग अधिक सक्षम होणार आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. किशोर पवार म्हणाले की, हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून जागतिक व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची अभिमानास्पद संधी आहे. या प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे शिक्षक, सहकारी, विद्यार्थी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच या परिषदेच्या माध्यमातून जगभरातील अग्रगण्य गणितज्ञांसोबत संशोधनाची देवाणघेवाण, नव्या संकल्पनांचा अभ्यास आणि भविष्यातील शैक्षणिक सहकार्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. किशोर पवार यांच्या या उल्लेखनीय यशाचे विद्यापीठ परिसरात आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासकांनी त्यांचे अभिनंदन करत भविष्यातील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound