रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जमातीतील तरुणांना शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर यांच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत १ ऑगस्ट २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण साडेतीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय तसेच निमशासकीय निवड मंडळांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि सराव चाचण्यांचा समावेश असेल. त्यामुळे अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रवेशासाठी उमेदवाराने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी, किमान दहावी उत्तीर्ण आणि १८ वर्षे पूर्ण वयाचा असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणादरम्यान नियमित उपस्थितीच्या आधारे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा एक हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा मोफत संच आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावी व पदवीच्या गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच अनुसूचित जमातीचा जात प्रमाणपत्र यांच्या मूळ आणि छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे. मात्र प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट क्र. २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०२५८४-२५१९०६ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



