पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह क्रीडा विभागातील उत्कृष्ट खेळाडूंचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे रवींद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. बी. भावसार, डॉ. जी. पी. बोरसे आणि प्रा. डॉ. अजय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. आर. बी. नेरकर यांनी या गुणगौरव सोहळ्याची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष ॲड. वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनातून साकार झाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

पदवी परीक्षेत विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयात दामिनी पाटील हिने प्रथम, आकांक्षा पाटील हिने द्वितीय तर प्रांजली वानखेडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. वनस्पतीशास्त्र विषयात प्रियंका पाटील प्रथम, मनीष परदेशी द्वितीय आणि हेमांगी महाजन तृतीय ठरले. संगणकशास्त्र विषयात गौरव साळुंखे प्रथम, अनुष्का पाटील द्वितीय आणि देवयानी पाटील तृतीय आली. कला शाखेतील इतिहास विषयात स्वाती पाटील प्रथम, रवीना वानखेडे द्वितीय आणि माधवी विसपुते तृतीय ठरल्या. मराठी विषयात तेजस्विनी माळी प्रथम, ऋषिकेश पाटील द्वितीय, तर इंग्रजी विषयात ज्योती पाटील प्रथम, प्रांजल पाटील द्वितीय आणि तेजस्विनी महाजन तृतीय आल्या. याशिवाय क्रीडा विभागातील गायत्री पाटील, दिपाली चौधरी, नम्रता पाटील, ज्योती पाटील, रोहित वाल्हे आणि कोहिनूर इंगळे या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथी ॲड. रोहन मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रमाणपत्र, बालतरू (वृक्षाचे रोप), गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारानंतर दामिनी पाटील, गौरव साळुंखे, माधवी विसपुते आणि मनीष परदेशी यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मार्गदर्शन करताना ॲड. रोहन मोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत यशामागे जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून परिस्थिती कधीही शिक्षणाच्या आड येत नाही हे सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेले वृक्षाचे रोप घरी लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी प्रत्येक शाखा आणि प्रत्येक विषय तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयाचा सखोल अभ्यास केल्यास भविष्यात रोजगार आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या गुणगौरव सोहळ्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून भविष्यात तेही अशाच यशासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. बी. नेरकर आणि प्रा. आर. बी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. सावंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



