जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील रामपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या कथित इमारत पाडकामाच्या पार्श्वभूमीवर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या या निवेदनात विद्यापीठाचे संरक्षण करावे, तसेच तेथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “मानवाला मानव म्हणून जगण्याची कला शिक्षणामुळेच प्राप्त होते. एका शाळेचे किंवा महाविद्यालयाचे दार उघडले तर दहा तुरुंगांची दारे बंद होतात,” असा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षणामुळे अज्ञानाचा अंधःकार दूर होतो आणि समाजाच्या प्रगतीला चालना मिळते, असेही फाउंडेशनने नमूद केले आहे.

निवेदनानुसार, रामपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाने अनेक वर्षांपासून शिक्षणदान, शैक्षणिक प्रसार आणि समाजोपयोगी कार्य करत हजारो विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. गरीब, होतकरू आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत देशाच्या प्रगतीतही या विद्यापीठाने योगदान दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठातील काही इमारती बेकायदेशीर असल्याचे सांगत त्या पाडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अशी कारवाई झाल्यास तेथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल आणि त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर फाउंडेशनने राष्ट्रपतींकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. विद्यापीठातील कोणतीही इमारत पाडू नये, संपूर्ण परिसराला संरक्षण द्यावे, ज्या ठिकाणी अनियमितता आढळत असेल तेथे दंड आकारून ती नियमित करण्याचा पर्याय स्वीकारावा किंवा अंतिम पर्याय म्हणून सरकारने संपूर्ण विद्यापीठ ताब्यात घेऊन ते चालवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करताना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, नाझिम पेंटर, अहमद ठेकेदार, हाजी शकूर बादशाह, शफी ठेकेदार, शेख रईस, शेख नझिरुद्दीन, शेख सईद यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.



