Home आरोग्य आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनाची...

आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनाची प्रक्रिया मार्गी

0
36

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या दीर्घकालीन मागणीला अखेर गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे अधिकृत पत्रव्यवहारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुऱ्हा व परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मार्च २०२५ पूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची अधिकृत मागणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पाठपुराव्यामुळे कुऱ्हा परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सुविधांच्या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर आपत्कालीन आरोग्य सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, प्रसूती सेवा, अधिक खाटांची सुविधा तसेच विविध विशेष वैद्यकीय उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, श्रेणीवर्धनाची प्रक्रिया मार्गी लागत असल्याचे स्पष्ट होताच या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही स्तरातून सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, उपलब्ध अधिकृत पत्रव्यवहार आणि शासन स्तरावरील नोंदींवरून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा आमदार चंद्रकांत पाटील यांनीच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा विषय कोणत्याही राजकीय श्रेयवादाचा नसून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांशी संबंधित आहे. त्यामुळे श्रेयाच्या वादाऐवजी श्रेणीवर्धनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून कुऱ्हा व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांना तातडीच्या आरोग्य सेवा, मातृ-शिशू आरोग्य सुविधा, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि उपचार स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाकडे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


Protected Content

Play sound