Home आंतरराष्ट्रीय सीए प्रतीक मणियार यांनी पूर्ण केली दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कॉमरेड्स मॅरेथॉन!

सीए प्रतीक मणियार यांनी पूर्ण केली दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कॉमरेड्स मॅरेथॉन!

0
21


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावचे रहिवासी असलेले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि उत्कृष्ट धावपटू प्रतीक मणियार यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानली जाणारी ‘कॉमरेड्स मॅरेथॉन २०२६’ यशस्वीरी्या पूर्ण केली आहे. त्यांनी १४ जून २०२६ रोजी झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुमारे ९० किलोमीटरचे कठीण अंतर अवघ्या १० तास २१ मिनिटे आणि ५६ सेकंदांत पार करून जळगावसह संपूर्ण भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.

अल्ट्रा मॅरेथॉन क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी कॉमरेड्स मॅरेथॉन पूर्ण करणे हे जगभरातील धावपटूंचे एक मोठे स्वप्न असते. सीए प्रतीक मणियार यांनी आपल्या दृढनिश्चयाच्या, शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे आंतरराष्ट्रीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतीक मणियार यांचा क्रीडा क्षेत्रातील हा प्रवास थक्क करणारा आहे. यापूर्वी त्यांनी अत्यंत खडतर मानली जाणारी जागतिक दर्जाची ‘आयरनमॅन’ (Ironman) स्पर्धा देखील यशस्वीपणे पूर्ण केली आहे. याशिवाय दोन वेळा हाफ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून त्यांनी आपली उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि अफाट सहनशक्ती सिद्ध केली आहे. आता आयर्नमॅननंतर कॉमरेड्स मॅरेथॉनचा टप्पा गाठून त्यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना प्रतीक मणियार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नीचे निरंतर प्रोत्साहन आणि पाठिंबा, प्रशिक्षकांचे अचूक मार्गदर्शन, मित्रांची साथ आणि ‘जळगाव रनर्स ग्रुप’च्या सर्व सदस्यांचे अमूल्य सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः त्यांची मुलगी स्तुती आणि मुलगा विरांश यांनी संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत त्यांचा उत्साह वाढवून घरात सकारात्मक वातावरण निर्माण केले, ज्याचा या प्रवासात मोठा फायदा झाला.

सीए प्रतीक मणियार यांच्या या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी यांच्यासह जळगाव रनर्स ग्रुप, चार्टर्ड अकाउंटंट्स, टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि वित्तीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांचा हा प्रवास तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगत समस्त जळगावकरांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आगामी क्रीडा स्पर्धांमधील पुढील यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound