Home Cities जळगाव जळगावात उघड्यावरील बेकायदेशीर मांस विक्री बंद करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

जळगावात उघड्यावरील बेकायदेशीर मांस विक्री बंद करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

0
17


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर व उघड्यावरील मांस विक्रीवर तात्काळ पूर्णपणे बंदी आणण्यात यावी, अशी आग्रही मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनपाच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यासाठी आज समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापौर यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील विविध नागरी वस्त्यांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला अत्यंत भयानक, अस्वच्छ आणि अनधिकृत रित्या उघड्यावर मांस विक्री सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महानगरपालिकेने या व्यवसायासंदर्भात स्पष्ट नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असतानाही, दुकानदारांकडून तिची सर्रास पायमल्ली केली जात आहे. या गंभीर प्रकारामुळे जळगावकर नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीविताचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलणे गरजेचे बनले आहे.

या निवेदनात प्रामुख्याने हिंस्त्र कुत्र्यांच्या वाढत्या हैदोसाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांमधून उरलेले मांसाचे तुकडे, रक्त आणि हाडे रस्त्यावर व कचराकुंडीत उघड्यावर टाकून दिली जातात. हे अन्न खाऊन रस्त्यावरील भटके कुत्रे अत्यंत क्रूर आणि हिंस्त्र बनत आहेत. परिणामी, शहरात लहान मुलांवर आणि पादचाऱ्यांवर कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केल्याच्या व त्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची दाट शक्यता समितीने व्यक्त केली आहे.

तसेच, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSSAI) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील तरतुदींनुसार निवासी भागात आणि उघड्यावर अशा प्रकारे मांस कापण्यास व विकण्यास सक्त मनाई आहे. मात्र, जळगावातील या दुकानदारांकडून परवाना, बंदिस्त जागा, स्वच्छतेचे निकष आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या मनपाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. नागरी वस्त्यांमध्ये तसेच मुख्य बाजारपेठेत या अनधिकृत दुकानांमुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून, संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना या परिसरामधून प्रवास करणे असह्य झाले आहे.

हिंदू जनजागृती समितीने प्रशासनाकडे प्रमुख कायदेशीर मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये शहरातील सर्व अनधिकृत व उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने त्वरित प्रशासकीय बळाचा वापर करून बंद करून ती सील करण्यात यावीत. मनपाच्या नियमांचे आणि न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. मनपाच्या स्वच्छता आणि अतिक्रमण विभागातर्फे शहरात नियमित गस्त घालून व्यवसायांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करावी, तसेच मांस विक्रेत्यांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांचा समावेश आहे.

जळगाव शहरातील नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे (भारतीय संविधानाचे कलम २१) हे थेट उल्लंघन असल्याचे समितीने म्हटले आहे. जर महानगरपालिका प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पुढील ७ दिवसांच्या आत ठोस व प्रत्यक्ष कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.

 


Protected Content

Play sound