Home Cities अमळनेर शहापूर येथे वीज कोसळून 32 वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; आईच्या...

शहापूर येथे वीज कोसळून 32 वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; आईच्या डोळ्यासमोर घडली हृदयद्रावक घटना

0
23


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शहापूर गावात वीज कोसळून एका 32 वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. राकेश रतिलाल पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, आईच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे आज दुपारी सुमारे 12 वाजता आपल्या आईसह आणि मजुरांसोबत शेतात काम करत होते. अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या वेळी राकेश आपली दुचाकी रस्त्यावर लावण्यासाठी घाईने निघाले असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि ते जागीच कोसळले.

घटनेच्या वेळी राकेशची आई आणि मजूर जवळच निंबाच्या झाडाखाली थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच हा अपघात घडल्याने तिने केलेला आक्रोश अत्यंत हृदयद्रावक होता. या घटनेमुळे उपस्थित मजुरांमध्येही भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले. राकेश पाटील यांचे वडील रतिलाल शालिग्राम पाटील हे शहापूर गावातील आदर्श बागायतदार शेतकरी असून, काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी राकेशवर आली होती. तरुण वयातच त्यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारत आधुनिक पद्धतीने शेती विकसित करण्याचा प्रयत्न केला होता.

वीज कोसळल्याने राकेश यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला होता. त्यांच्या अंगावरील कपडे आणि गळ्यातील रुमालही जळाल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तातडीने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर शहापूर गावात शोककळा पसरली आहे. राकेश पाटील यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी उशिरा सात वाजता शहापूर येथे राकेश पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound