पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीमुळे नागरिकांना अधिक सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, या कार्यालयाशी संबंधित स्टॅम्प वेंडर बांधवांच्या व्यवसायासाठीही योग्य व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जाणार आहेत. स्टॅम्प वेंडर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या असता, त्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन भविष्यात प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
मा. आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि आमदार अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहरातील तहसील कार्यालयालगत कासोदा रस्त्यावर दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी २.३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करून आमदार अमोल पाटील यांनी ही इमारत पूर्णत्वास आणली. त्यामुळे जमीन खरेदी-विक्री तसेच मालमत्तेशी संबंधित विविध व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालय हे जमीन व्यवहारांचे महत्त्वाचे केंद्र असल्याने अनेक स्टॅम्प वेंडर बांधवांचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह या कार्यालयावर अवलंबून आहे. नवीन इमारतीच्या पार्श्वभूमीवर कार्यालय परिसरात व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी स्टॅम्प वेंडर संघटनेने केली. यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान आमदार अमोल पाटील यांनी स्टॅम्प वेंडर बांधवांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. भविष्यात या कार्यालयाच्या परिसरात सभागृह अथवा शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या माध्यमातून स्टॅम्प वेंडर बांधवांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक व्यावसायिकांचे हित जपणे आणि शहराच्या विकासाला गती देणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगताना आमदार अमोल पाटील यांनी लोकाभिमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला. नव्या इमारतीमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यासोबतच संबंधित व्यवसायिकांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी स्टॅम्प वेंडर संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आमदार अमोल पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करत भविष्यातही सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.



