
पुणे-वृत्तसेवा । पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील अनेक भागांत जोरदार पावसासह वादळी वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. त्यामुळे नागरिक उष्णतेने त्रस्त झाले होते. शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि शहराच्या पश्चिम तसेच पूर्व भागात पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.पुणे शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने पुढील दोन दिवस शहरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. भोर तालुक्यातदेखील मुसळधार पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे काही भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कोंढवा परिसरातील ज्योती चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी नागरिकांना पावसापासून बचावासाठी आडोशाला थांबावे लागले. पिंपरी चिंचवड शहरातही दुपारच्या सुमारास अचानक अंधारमय वातावरण निर्माण झाले. काळे ढग दाटून आल्याने दुपारी चार वाजताच संध्याकाळ झाल्याचा भास निर्माण झाला होता. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांनी या पावसाचे स्वागत केले.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढग दाटून येत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. शुक्रवारी मात्र वातावरणात अचानक बदल होऊन मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही नागरिक आणि वाहनचालक पावसात अडकले असल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील काही भागांतही पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम आहे.



