भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा रोडवर मंगळवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात २८ वर्षीय तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर चिंदू सोनवणे (रा. भानखेडा) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेने भानखेडा ग्रामस्थांसह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सोनवणे हे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास साकेगाव येथून आपले काम आटोपून गावाकडे परतत होते. गाव जवळ आले असतानाच, गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर जोगलखेडा रोडवर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यांची दुचाकी रस्त्याशेजारील विद्युत खांबावर आदळली की एखाद्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली, या निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत.

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भोई या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


